Ad will apear here
Next
कलेचा वारसा जपणारी निगडीतील वालचंद कोठाडिया आर्ट गॅलरी
गॅलरीतील चित्राकृती

१९०७मध्ये जन्मलेले आणि मूळचे निपाणीचे असलेले चित्रकार वालचंद कोठाडिया यांनी ‘जेजे’मध्ये रीतसर कलाशिक्षण घेतले. ग्रामीण भागातही सहजी उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या वापरातून अपारंपरिक चित्रनिर्मिती करण्याचा छंद त्यांनी जोपासला. त्यातून त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर चित्राकृती घडवल्या. अनेक महिला, मुले आणि तरुणांना त्यांनी मोफत प्रशिक्षण दिले. त्यांचा मुलगा इंजिनीअर अरविंद कोठाडिया यांनी त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी निगडीत उभारलेल्या आर्ट गॅलरीचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा, मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांचा हा लेख...
.......
पिंपरी-चिंचवड हे मुख्यत्वेकरून औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. निगडी-प्राधिकरण हा याच महानगरपालिकेचा भाग आहे. प्राधिकरणातील प्रशस्त रस्ते, रुंद पदपथ, वृक्षलागवड व बैठ्या घरांमुळे या परिसराचे वेगळेपण दिसून येते. या परिसराला पायाभूत नागरी सुविधांचे पाठबळ लाभूनही सौंदर्यपूर्ण इमारतींची संख्या खूपच कमी आहे. निगडी प्राधिकरणच्या सेक्टर २७मधील हेडगेवार भवनासमोरील ‘चिरंतन’ नावाची इमारत मात्र यास अपवाद आहे. या इमारतीच्या दर्शनी भिंतीवरील ‘वालचंद कोठाडिया आर्ट गॅलरी’ ही वळणदार अक्षरे आपले लक्ष वेधून घेतात. चित्रकार वनिता लकडे व डॉ. प्राध्यापक संजय लकडे यांच्या चित्रकला व छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभानिमित्ताने या गॅलरीला भेट देण्याचा योग आला. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध वॉटर कलर आर्टिस्ट कुडल्य हिरेमठ यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक लायन ओमप्रकाश पेठे उपस्थित होते. जवळपास शतकभर जोपासलेल्या चित्राकृतींचे रीतसर जतन व्हावे या उद्देशाने तळमजल्यावरील प्रशस्त हॉलचे गॅलरीत रूपांतर केल्याचे तृप्ती शहांनी सांगितले. चित्रकार वालचंद कोठाडिया हे त्यांचे आजोबा. त्यांनी चित्रांकित केलेल्या अनोख्या चित्रसंग्रहाची महती व माहिती कला क्षेत्रातील कलावंतांना व्हावी, या उद्देशाने हा लेखनप्रपंच.



आधुनिक वास्तुशैलीत बांधलेल्या ‘चिरंतन’ या इमारतीची दोन वैशिष्ट्ये आहेत. कला-सौंदर्य आधारित वास्तुरचना हे पहिले, तर अनोख्या कलाकृतींचा संग्रह असलेले कलादालन हे दुसरे वैशिष्ट्य होय. इमारतीस लाभलेले उंची व रुंदीतील प्रमाणित आकारमान, दर्शनी भिंतीवरील चौरस आकारातील खिडकी व आयताकार प्रशस्त बाल्कनीच्या संतुलित आकारमानामुळे दर्शनी भाग आकर्षक दिसतो. तसेच फिकट पिवळसर रंगलेपन व इतर घटकांच्या रंगसंगतीमुळे इमारत कमालीची प्रसन्न व सौहार्दपूर्ण दिसते. ही बंगलीवजा इमारत ‘पोकळी भिंत बांधकाम प्रणाली’ (डबल वॉल) रचनेवर आधारित आहे. दोन भिंतींच्या खोबणीत दडवलेल्या छज्जाविरहित अरुंद व लंब आकारातील खिडक्यांच्या रचनेमुळे अति उष्ण अथवा अति थंड हवेपासून इमारतीतील तापमान संतुलित राहण्यास मदत होते. तसेच, चहूबाजूंच्या भिंतीवरील विविध घटकांतील प्रमाणबद्धता, समतोलपणा, सुसंगत व सुसंबद्ध वास्तुरचनेमुळे सौंदर्यपूर्ण दिसते. 



परिसरातील बहुतांश इमारतींच्या दर्शनी भिंतीवर विजोड आकारातील खिडक्या, छज्जे व सामान्य दर्जाचे पेटीवजा लोखंडी सुरक्षा कवच, पक्षी व डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी लावलेली प्लास्टिकची जाळी इत्यादी घटकांची सरमिसळ आढळते. चिरंतन इमारतीचा दर्शनी भाग या पद्धतीस छेद देणारा आहे. म्हणून इमारतीचे वेगळेपण लक्षात राहते. इमारतीच्या मोकळ्या जागेतील शहाबाद फरसबंदीचा आकार, ठसठशीत सांधेजोड व ओबडधोबड पृष्ठभागावरील भुरकट तांबड्या छटा आणि चढ-उतार फरकांमुळे या जागेतील रंजकता वाढून त्या जागेचे कलात्मक मूल्य वाढले आहे. तसेच सुरक्षा कंपाउंडवर रेंगाळणाऱ्या गर्द हिरव्या वेलीतून डोकावणारी गुलाबी रंगाची नाजूक फुले, तसेच हळुवार वाऱ्याच्या झुळकीमुळे सहजी हलणाऱ्या सडसडीत झाडांच्या लांब फांद्यांमुळे आवारातील वातावरण रमणीय व चैतन्यपूर्ण भासते. नेमका अशाच प्रकारचा दृष्यानुभव आर्ट गॅलरीतील चित्राकृतींतून अनुभवण्यास मिळतो. 



गॅलरी खासगी असूनही ती व्यावसायिक पातळीवरही उच्च ठरते. एकाच जागेत दोन उद्देश सहजपणे सामावून घेण्याची क्षमता मूळ इमारतीच्या रचनेत असल्यामुळे खासगी बंगला आणि आर्ट गॅलरीतील फरक जाणवत नाही. याचे संपूर्ण श्रेय मूळ वास्तुरचनाकाराचे आहे, असे मला वाटते. 

चित्राकृती पाहण्यास आलेली मुले

गॅलरीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या कोपऱ्यात कोठाडियांचा अर्धपुतळा ठेवला आहे. गॅलरीची अंतर्गत रचना, लाइट इफेक्ट्स इत्यादी सजावट मोठ्या शहरातील उच्च दर्जाच्या गॅलरीच्या धर्तीवर केलेली आहे, हे विशेष! गॅलरीत मांडलेल्या चित्रसंग्रहातील प्रत्येक चित्र उत्कृष्ट दर्जाचे आहे व ते वेगवेगळी साधने वापरून चितारलेले आहे. चित्राकृती धुळीपासून सुरक्षित राहाव्यात, म्हणून रोलिंग पडद्यांची सोय आहे. चित्रकाराने निर्माण केलेल्या कलामाध्यमाची ओळख कलेची आवड असलेल्या सध्याच्या हौशी कलावंतांना व्हावी म्हणून कार्यशाळा आयोजित केल्या जातात, असे तृप्ती शहांनी सांगितले.

निपाणी येथील घरात चित्रकलेचे प्रशिक्षण देताना वालचंद कोठाडियाअनेक वर्षांच्या कलातपस्येनंतर चित्रकाराने सातत्याने रूढ केलेल्या कलेस मान्यता व नावलौकिकही प्राप्त होतो. पुढे जाऊन त्याने जोपासलेल्या कलेची ओळख सर्वत्र पोहोचते. रंग हे चित्रकाराचे माध्यम. ग्रामीण भागातही सहजी उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या वापरातून अपारंपरिक चित्रनिर्मिती करणे हा चित्रकार कोठाडियांचा छंद! त्यांच्या चित्राकृतीत अनेक स्तरांचे मिश्रण आढळते. या स्तरात नैसर्गिक साधनांच्या वापरासाठी ते आग्रही असत. कापड अथवा कृतिजन्य रेशमाचे रंगीत धागे, माशांचे खवले, पॅकिंगसाठी वापरले जाणारे सुके गवत अशा टाकाऊ वस्तूंच्या वापरातून चित्रविषयाला मूर्त स्वरूप देऊन जिवंतपणा आणला आहे. निकामी वस्तूंच्या वापरातून चित्रनिर्मितीचा आनंद घेण्याचा पायंडा त्यांनी रूढ केला. ग्रामीण भागात साधने नसतात, म्हणून कलानिर्मिती होऊ शकत नाही, या विचाराला छेद देऊन त्यांनी ही कला विकसित केली. कलेची आवड असणाऱ्या अनेक ग्रामीण कलावंतांना मार्ग दाखवण्याचे कार्य केले. त्यांना अनेक सन्मान व पारितोषिके मिळाली. परंतु त्याचा त्यांनी दिखावा कधीच केला नाही! वालचंद कोठाडियांच्या कला क्षेत्रातील योगदानाप्रीत्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ आर्ट गॅलरी उभी करण्याचे स्वप्न त्यांच्या नातवंडांनी साकारले. 

साहित्यिक वि. स. खांडेकर यांना कलाकृती दाखवताना वालचंद कोठाडियाचित्रविषय ठरवताना मूळ साधनाचा नैसर्गिक रंग, छटा व पोत या सर्वांचा पूरेपूर विचार त्यात असल्याचे दिसून येते; इतकेच नव्हे तर चित्राकृतीसाठी वापरलेली साधनेच चित्ररूपात दिसतात. वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या टाकाऊ वस्तूंमधील गुणविशेष हेरून ते चित्राकृतीत उत्तम प्रकारे मांडत. तत्कालीन रुढीनुसार कापड, सुई व धाग्याचा वापर असलेल्या ‘भरतकाम’ कलेत स्त्रिया व मुलींना गुंतवले जात असे. या कामात टेबलक्लॉथ, पडदे, साड्या अशा घरगुती वस्तूंच्या वापरावर भर असे. ग्रामीण स्त्रियांना टाकाऊ कृतिजन्य माध्यमातून चित्राकृती निर्माण करण्याचे आगळेवेगळे प्रशिक्षण देऊन त्यांचे कलाविश्व मोठे करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोठाडियांनी केले. वालचंद कोठाडियांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी ग्रामीण भागात कलेचे बीज रोवून ते तंत्र विकसित केले होते, हे प्रदर्शित चित्राकृतींतून दिसून येते. 

उषा मंगेशकर यांच्या हस्ते आर्ट गॅलरीचे उद्घाटन झाले.

चित्रकार वालचंद कोठाडिया मूळचे कर्नाटकातील निपाणी गावचे. त्यांचा जन्म १९०७ सालचा. मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयात १९२९मध्ये त्यांनी कलेचे रीतसर शिक्षण घेतले होते. कलाशिक्षणानंतरचा काही काळ ते कोल्हापूर येथील प्रभात सिनेकंपनीतही कार्यरत होते. शिक्षणकाळात जोपासलेल्या आवडीतून स्वतःचे कला-मनोगत व्यक्त करण्याचा निर्णय घेऊन ते निपाणीस परतले. दरम्यान, महर्षी कर्वे यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी महिला शिक्षण संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रिया व मुलींना कलाशिक्षण मिळावे म्हणून सात जुलै १९३८ रोजी निपाणी येथे कन्या शाळेची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता. पुढे याच शाळेत कलाशिक्षक म्हणून ते १९ जून १९७१ पर्यंत कार्यरत राहिले. या प्रवासात त्यांनी अनेक महिला, लहान मुले व तरुण चित्रकारांना विनामूल्य प्रशिक्षण दिले. १९७९मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

स्ट्रीट सिंगरकला कोणतीही असो, निर्मिती प्रक्रियेशी एकरूप झाले, की त्या आविष्कारातून आनंद मिळतो. मानवी केस वापरून रवींद्रनाथ टगोर, शेंगांच्या फोलांपासून बनवलेले महात्मा गांधींचे पोर्ट्रेट, शिकारीच्या शोधात निघालेली श्वानजोडी रेशमी धाग्यांपासून, तर कापडी चिंध्यांतून बनवलेला यात्री, गव्हाच्या काड्यांपासून बनवलेले कॉम्रेड लेनिन अशा अनेक चित्राकृती या संग्रहात आहेत. या चित्रनिर्मितीसाठी केलेला साधनांचा वापर किती कल्पक व अनुरूप होता हे त्या त्या चित्राकृतीच्या सर्जनशीलतेतून दिसून येते. चित्राकृतीतील तपशीलाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यासाठी वापरलेल्या निरनिराळ्या माध्यमांचा गडद किंवा फिका रंग, आकार व अवकाश यांचा समतोल, दृश्यातील छाया-प्रकाश, रंगारंगातील विविधता व विरोध, एखाद्या विशिष्ट रंगाचे प्राधान्य व चित्रातील मूळ साधने एकमेकांत एकरूप होऊन आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व दिसत असूनही कलाकृतीचा दृश्य स्वरूपातील एकसंघ परिणाम दिसून येतो. 

कॉ. लेनिनत्यांनी निर्माण केलेल्या बक्षिसपात्र चित्राकृतींपैकी ‘स्ट्रीट सिंगर’ ही कलाकृती आजही लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पंडित नेहरूंना भेट दिलेली कलाकृती अलाहाबाद म्युझियममध्ये आहे. चित्रकार कोठाडियांनी चित्रित केलेल्या प्रत्येक कलाकृतीत अभिजात कलेचा प्रयत्न दिसून येतो. म्हणून त्यांनी निर्माण कलेल्या चित्राकृती वास्तवतेच्या पलीकडे घेऊन जातात. कोठाडियांच्या कलाकृतीतील मूल्ये, कल्पना व कला-विचार आजही नवीन वाटतात. त्यामुळे जवळपास शंभर वर्षांनंतरही कलाकृतींमधील ताजेपणा आजही टिकून आहे, हे विशेष! 

श्वानजोडीचित्राकृतींतील ताजेपणा चिरंतन टिकून राहावा व नवोदित जाणकार कलाकारांना त्यातील बारकाव्यांचे आकलन व्हावे म्हणून अतिपारदर्शक बेल्जियम काचेचा वापर केल्याने तृप्ती शहांनी सांगितले. गॅलरीचे उद्घाटन गायिका उषा मंगेशकर यांनी केले होते. आर्टिस्ट रवी परांजपे, उद्योजक विठ्ठल कामत यांनीही गॅलरीला भेट देवून प्रशंसा केल्याचे श्रद्धा शहा आणि तृप्ती शहांनी सांगितले. 

रवींद्रनाथ टागोरवालचंद कोठाडियांचे जन्मगाव असलेल्या निपाणी येथेदेखील त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मांडले आहे. गॅलरीला भेट देणाऱ्या अनेक दिग्गजांमध्ये साहित्यिक वि. स. खांडेकर, लेखिका मालतीबाई दांडेकर, सामाजिक कार्यकर्ते गो. बा. महाशब्दे, आमदार अरुण गुजराथी अशा अनेकांचा समावेश असून, त्यांनी त्यांच्या कलेची प्रशंसा करून अभिप्राय नोंदवला आहे. भारत सरकारने त्यांना ‘कलामहर्षी’ या उपाधीने गौरवून सत्कार करावा, असे मत औंध (सातारा) येथील महाराष्ट्र वाड्मय मंडळाचे संपादक व प्रकाशक जीवन किर्लोस्कर यांनी मांडले होते.

चित्रकार हा जात्याच अधिक संवेदनशील असतो. तप्त उन्हात उजाड माळरानावर चालताना जो त्रास होतो, तसेच वर्तमान शहरांतही जाणवते. अगदी रोजच्या रोज दिसणाऱ्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींतही आनंद मिळवता येतो हे आपण विसरत चाललो आहोत. कलासक्त मन नेमके याचाच शोध घेत असते; शोध घेणाऱ्याकडे फक्त दृष्टी हवी! ‘चिरंतन’ इमारतीचे अंतर्बाह्य सौंदर्य खुलवणाऱ्या अनेक घटकांसोबत या वास्तूला अनोख्या कलेचा वारसादेखील लाभला आहे. प्रस्तुत वास्तुविशारद-लेखकाने मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन अनेक पुरातन इमारतींचा वास्तुकला-सौंदर्य दृष्टिकोनातून वेध घेतला आहे. वालचंद आर्ट गॅलरीच्या निमित्ताने इमारत व चित्राकृती या कलेतील वास्तुकला-सौंदर्य व अनोख्या चित्राकृतींचे संयुक्त अवलोकन करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो. 

चित्रांचे अवलोकन करताना मीना मंगेशकर-खडीकर

संपर्क : चंद्रशेखर बुरांडे – fifthwall123@gmail.com

(चंद्रशेखर बुरांडे यांचे अन्य लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZRICF
Similar Posts
१८ वर्षांच्या चिन्मयने लिहिलेले उत्तम नाटक - संगीत चंद्रप्रिया ‘संगीत चंद्रप्रिया’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले असून, ते चिन्मय किरण मोघे या अवघ्या १८ वर्षांच्या प्रतिभासंपन्न तरुणाने लिहिले आहे. सर्वार्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या या नाटकाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
‘मिस यू मिस्टर : आजच्या पिढीच्या नात्यांची कथा’ मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर अभिनित ‘मिस यू मिस्टर’ हा मराठी चित्रपट २८ जून २०१९ रोजी प्रदर्शित होतो आहे. समीर जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले असून, ओंकार रेगे या तरुण लेखकाने सहलेखक, सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल ओंकार रेगेशी साधलेला हा संवाद
राह पकड तू एक चलाचल... एकाच प्रकारचे दृश्य घटक घेऊन त्यातील सर्व शक्यतांचा धांडोळा गेल्या एक दशकाहून अधिक काळ राजाराम होले हे चित्रकार घेत आहेत. अशा शक्यता पडताळून पाहण्यासाठी खूप धीर लागतो. वारंवारिता हा डिझाइनचा प्रकार होले वापरतात. होलेंच्या एकूण कारकिर्दीकडे पाहताना हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ काव्यसंग्रहातील ‘राह
आर्ट मंडी : समाजात मिसळणारी कलाचळवळ पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडईत गेली तीन वर्षे २६ जानेवारी रोजी आर्ट मंडी या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. मंडईत भाजीखरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना चित्रे, शिल्पेही पाहता आणि खरेदी करता यावीत, समकालीन कला समाजापर्यंत पोहोचावी, हा या प्रयोगामागचा उद्देश आहे. ‘स्मरणचित्रे’ या सदरात आज त्या अनोख्या प्रयोगाबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language